प्रचंड खळबळ : हवेली पोलिसांनी खडकवासला धरणातून काढला मृतदेह बाहेर
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरातील सर्व झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृतदेह पुण्यातील खडकवासला धरणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
अनुराधा गोरे (वय-42 रा. देशमुख वाडी, न्यु कोपरे, ता. हवेली, जि. पुणे) असे महिलेचे नाव आहे. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पोलिसांनी सांगितले की, पती, मुलगा व मुलगी झोपलेले असताना अनुराधा या सकाळी लवकर उठून घराबाहेर पडल्या. जाताना त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली होती. पती अनिल गोरे हे उठल्यानंतर त्यांना अनुराधा घरात दिसल्या नाहीत. त्यांनी दरवाजा उघडण्याच प्रयत्न केला असता दरवाजा बाहेरुन बंद होता. त्यांनी शेजाऱ्यांना फोन करुन दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यांनी अनुराधा यांचा परिसरात शोध घेतला परंतु त्या सापडल्या नाहीत. दरम्यान, सकाळी 9.30 ते 10 च्या दरम्यान फिरायला जाणाऱ्या नागरिकांना खडकवासला धरणातील पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याची माहिती हवेली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पुणे-पानशेत रस्त्यालगत लागून खडकवासला धरणात पंप हाऊस जवळ असलेला मृतदेह बाहेर काढून फोटो जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवला. बराच वेळ झाला तरी अनुराधाचा शोध लागला नसल्याने पती अनिल गोरे हे तक्रार दाखल करण्यासाठी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठवलेला फोटो गोरे यांना दाखवला. गोरे यांनी तो फोटो ओळखला आणि हवेली पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनिल गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जालिंदर गायकवाड करीत आहेत.
