आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फिल्मीस्टाईलने अडवताच पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 21, 2022
Spread the love

आठजणांना केले जेरबंद : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडेखोरांना फिल्मीस्टाईलमध्ये अडवले. त्यापैकी काही जण गाडीतून उतरले, तर काही जण डोंगराच्या दिशेने पळाले. दरोडेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी (दि. २० जानेवारी २०२२) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, आत्तापर्यंत आठ दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, डोंगरामध्ये पळून गेलेल्या अज्ञातांचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार आणि दरोडेखोर हे मुंबईहून पुण्याच्या दिशेने पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला, दरोडेखोर दोन गाड्यांमध्ये होते. ते उर्से टोल नाका येथे येताच त्यांना गाडीतून खाली उतरण्यास पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एका गाडीतील पाच जण खाली उतरले तर इतर दरोडेखोरांनी पोलिसांना बघून पळण्याचा प्रयत्न केला. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता यात दरोडेखोरांच्या गाडीचा डॅश लागल्याने पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. दरोडेखोर द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या विरुद्ध दिशेने गाडी घेऊन काही अंतरावर गेले. काही अंतरावर गाडी थांबवून ते रस्त्यालगतच्या डोंगरांमध्ये पळून गेले. त्यापैकी काही जणांना शोधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. दरम्यान, गुंडा विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक, गुन्हे शाखा युनिट पाच हे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी डोंगराळ भागात आरोपींचा शोध घेत आहेत.