सहकारनगर पोलिसांची कामगिरी : दारू पिण्यास पैसे न दिल्याने सत्तूरने केली होती मारहाण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या सहकारनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या. दारू पिण्यास पैसे न दिल्याने घाबरून पळून गेलेल्या आरोपीला तिरुपतीनगर येथील पत्र्याच्या शेडजवळ ताब्यात घेतले.
अशोक मनोहर पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, धनकवडी येथील भंगार मालाच्या गोडावूनमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून लोखंडी सत्तूरने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद सहकारनगर पोलिसांत दाखल होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी तिरुपतीनगर येथील पत्र्याच्या शेडजवळ थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. त्यावेळी दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून सत्तूरने वार करून जखमी केल्यानंतर घाबरून तेथून निघून गेलो, अशी कबुली आरोपीने दिली.
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनूस मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, सर्वेलन्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बापू खेंगरे, पोलीस अंमलदार बापू खुटवड, सोपान नावडकर, अभिमन्यू सोनवणे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदीप बेडीस्कर, शिवा खेड, निखील राजीवडे, प्रदीप चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
