मुंढवा पोलिसांकडून दोघांना अटक : घरमालकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरगुती कारणावरुन पत्नीने बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गजेंदर चित्तरसिंग नायक (वय ३६) व महिला (वय ३२, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कप्तानसिंग नायक (वय ३७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, कप्तानसिंग नायक हा बिगारी काम करीत होता. केशवनगर येथील गुरुकृपा सोसायटीत ते राहतात. कप्तानसिंग हा मुळचा दिल्लीचा आहे. तर त्याची पत्नी मुळची सोलापूर येथील राहणारी आहे. कप्तानसिंग याला दारुचे व्यसन होते. तो सतत दारु पिऊन पत्नीला मारहाण करीत असत. शनिवारी रात्री तो दारु पिऊन आला. त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून तिने साडुच्या मदतीने रविवारी दुपारी कप्तानसिंग याला बेदम मारहाण करुन त्याचा गळा आवळला. त्यात कप्तानसिंग हा निपचित पडला होता. त्यानंतर तिने कप्तानसिंग उठत नसल्याचे शेजारच्यांना सांगितले. घरमालकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कप्तानसिंग याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार बेदम मारहाण आणि गळा आवळल्यामुळे मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हlनंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
