आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘हिमाली’ गृहरचना संस्थेत 19 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 27, 2022
Spread the love

एरंडवण्यातील प्रकार : अलंकार पोलीस स्टेशनमध्ये सचिव सुरेश शहा यांच्यासह तिघांवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील एरंडवणे येथील हिमाली रेसिडेन्शीयल सहकारी गृहरचना संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेच्या सचिवासह तिघांवर अलंकार पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2016-17 आणि 2018-19 च्या लेखापरीक्षणात समोर आला आहे.

संस्थेचे सचिव सुरेश शहा, अकाउंटंट (रा. डी.एस.के. विश्व, धायरी), मदतनीस दुर्गेश साबणे (रा. कर्वेरोड, दशभुजा मंदिराजवळ, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी लेखापरीक्षक प्रतिभा घोडके (वय-50 रा. नालंदा हौसिंग सोसायटी, बिबवेवाडी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांना सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी एरंडवणे येथील हिमाली रेसिडेन्शियल सहकारी गृहरचना संस्थेचे लेखापरीक्षण करण्यास सांगितले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी 2016-17 आणि 2018-19 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केले. यावेळी सुरेश शहा आणि उर्मिला धोत्रे यांनी संस्थेची सारस्वत बँकेत मुदत ठेव ठेवल्याची दफ्तरी नोंद केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी अशी कोणतीही मुदत ठेव केलेली नाही. आरोपींनी संस्था, व्यवस्थापकीय समिती आणि सभासद यांची 19 लाख 76 हजार 575 रुपयांची फसवणूक करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासणीत दिसून आले.

आरोपी शहा आणि धोत्रे यांना दुर्गेश साबणे याने यामध्ये मदत केली. दरम्यान सचिव सुरेश शहा यांचे निधन झाले असून इतर दोन आरोपींकडे चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाणे करीत आहेत.