हवेलीतील २३ प्राथमिक व दोन माध्यमिक शाळा : सायबर पोलीस व सेव्ह द चिल्ड्रनचा उपक्रम सुरू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सायबर पोलीस व सेव्ह द चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालून सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती अभियान २७ जानेवारी १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान फिरत्या वाहनाद्वारे सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सायबर पोलीस स्टेशनमधील अधिकारी, अंमलदार तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेचे पुण्यातील प्रकल्प व्यवस्थापक अमिताभ बारीक, प्रकल्प समन्वयक हनुमंत पवार, क्षमता विकास अधिकारी संदीप जाधव व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान मिळत आहे.
अलीकडे इंटरनेटच्या माध्यमातून सामान्यांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. २०१८- ५५२३, २०१९-७७९५, २०२०- १४९५०, तर गतवर्षी २०२१मध्ये १९०२३ अशी तक्रारींची वाढती संख्या असल्याचे सायबर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आली आहे. तसेच सेव्ह द चिल्ड्रन या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सायबर पोलीस स्टेशनला भेट देऊन बालकांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत हवेली तालुक्यातील १८ गावांत २३ प्राथमिक व दोन माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनच्या परवानगीने सायबर गुन्ह्यास प्रतिबंध घालण्यासाठी सायबर सुरक्षाविषयक जनजागृती सुरू केली आहे.
सायबर गुन्ह्यांना बालक व नागरिक बळी पडू नयेत, यासाठी सायबर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावांमध्ये चित्ररथ, प्रचारसभा व प्रसारमाध्यमे यांच्याद्वारे जनजागृती करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. सायबर सुरक्षा संबंधी चित्रफिती, पोस्टर्स, ऑडिओ क्लीप्स व तक्रारदारांना तक्रार कोठे करावयाची याविषयी माहिती असलेली पोस्टर्स बनविली आहेत.
