आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 28, 2022
Spread the love

एमपीडीए कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 54 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार सौरभ शरद शिंदे (वय-20 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सौरभ शिंदे याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सौरभ शिंदे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 06 गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सौरभ शिंदे याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांनी मागिल एक वर्षात 54 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.