आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शादी डॉट कॉमच्या ओळखीतून तरुणीला 24 लाखांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 29, 2022
Spread the love

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा : ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगितले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअरमध्ये नोकरीला असल्याचे सांगून एकाने बनावट नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला तब्बल २४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी निशांत रमेशचंद्र नंदवाणा (रा. किशनगंज, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बालेवाडी येथे राहणाऱ्या ३१ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला हिने विवाहासाठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. तेथे निशांत नंदवाणा याने अधितांश शिवप्रकाश अग्निहोत्री या बनावट नावाने नाव नोंदविले होते. या संकेतस्थळावर त्यांची ओळख झाली. आरोपीने तो सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअरमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३० ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ दरम्यान वेगवेगळी कारणे सांगून एकूण २४ लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबाबत चौकशी केल्यावर त्याचे नावही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे तपास करीत आहेत.