आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोन वर्षांपासून फरारी पिंटू मारणे टोळीचा मुख्य सुत्रधारास अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 29, 2022
Spread the love

कात्रजमध्ये घेतले ताब्यात : गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेला आणि पिंटू मारणे टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी (दि. २७) कात्रज येथील बस डेपो समोरील सार्वजनिक रोडवर ही कारवाई केली.

युतिन उर्फ बॉबी अरविंद पाटील (वय-26 रा. भद्रे पार्क, उत्तमनगर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१चे पथक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फरार, तडीपार, अभिलेखावरील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी बॉबी पाटील हा कात्रज बस डेपोसमोर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत तपास केल्यानंतर त्याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीला उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक गणेश ढगे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.