आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोडीतील आरोपीला १२ तासांत मुद्देमालासह ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 30, 2022
Spread the love

मनमाड लोहमार्ग पोलीस स्टेशनमधून घेतले ताब्यात : रांजणगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी करून पळून जाणाऱ्या चोरट्याला ९० हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ६२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. रांजणगाव पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड लोहमार्ग पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली.

शिरूरमध्ये घरफोडी करून ९० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एखूण दोन लाख ६२ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तपासाची चक्रे फिरविली.

रांजणगाव पोलीस स्टेशनमधील तपास पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून समांतर तपास सुरू असताना गुन्ह्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर लोखंडी गज आढळून आला. तेथील भाडेकरू नवीन प्रदीप निशाध (मूळ रा. कुरापट्टी, जि. जोहनपूर, जि. उत्तर प्रदेश) रात्रीच घर सोडून उत्तरप्रदेशमध्ये गेल्याचे समजले.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाआधारे तपास घेतला असता आरोपी पुमे-जसिडी एक्स्प्रेसमधून मूळ गावी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी मनमाड लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी ताबडतोब पोलिसांच्या मदतीने ट्रेनमधून आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याच्याकडे मुद्देमालासह रोख रक्कम मिळाली.

दरम्यान, रांजणगाव तपास पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण पोलिसांनी मनमाड लोहमार्ग पोलीस स्टेशन येथून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे करीत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सुहास रोकडे, दत्तात्रय शिंदे, वैभव मोरे, विजय शिंदे, उमेश कुतवळ, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, तुषार पंधारे, जनार्धन शेळके, अजित भुजबळ, राहू मोमीन, मंगेश थिगळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. मनमाड लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर जोगदंड, दिनेश पवार, राजू बच्चाव संतोष भालेराव यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले.