बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : परवान्यासाठी 15 हजार रुपयांची मागितली लाच
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सरकारी कामे करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यासाठी 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
अनिल कोंडाजी आढारी (वय-40) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर पुणे एसीबीकडून 29 सप्टेंबर 2021 रोजी पडताळणी करण्यात आली. यानंतर आढारी विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, अनिल आढारी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंगळवार पेठेतील उपविभागात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे. तक्रारदार यांना कंपनीसाठी सरकारी कामे करण्यासाठी परवाना आवश्यक असल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. परवाना देण्यासाठी आढारी याने 10 ते 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच त्याने स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी मागितली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरुन पडताळणी केली असता अनिल आढारी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आढारी विरिद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
