आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एटीएम मशीन चोरणारी टोळी गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 4, 2022
Spread the love

पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी : बोलेरो आणि पिकअप गाडीचा केला होता वापर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुरटी (ता. बारामती, जि. पुणे) येथील निरा-मोरगाव रस्त्यावरील एटीएम मशिन चोरणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. आरोपींनी बोलेरो व पिकअपचा वापर करुन एटीएम मशिन चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

बनवारीलाल उर्फ राजू मोहनलाल मीना (वय-34), बाबूलाल उर्फ पप्पू गोपाळ चौधरी (वय-30 दोघे रा. कारेगाव, ता. शिरुर, मूळ रा. पाचार ता. दातारामगड, जि. सिखर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मुरटी (ता. बारामती) येथील इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशिन 16 जानेवारी रोजी पहाटे चोरीला गेले होते. या घटनेत 4 लाख 11 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. तपासादरम्यान गुन्ह्यात पांढऱ्या बोलेरो वाहनाचा वापर केल्याचे समोर आले. पोलिसांनी गाडीचा शोध घेण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी ही गाडी शिरुर तालुक्यातील कारेगाव परिसरात असल्याचे दिसून आले. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित याच वाहनाचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडले यांच्या मदतीने वाहनाचा शोध घेवून दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी बनवारीलाल मीना हा त्याचा मित्र बाबुलाल चौधरी याच्यासोबत या वाहनाचा वापर करत होता. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत याच वाहनाचा वापर करुन जावळा (ता. पारनेर) तालुक्यातील एटीएम मशिन चोरी केल्याचे आरोपींनी सांगितले.

पोलिसांनी त्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. मात्र, त्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे नव्हती. गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता ही गाडी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. याबाबत तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीसह नगर जिल्ह्यातील पारनेर, तोफखाना, श्रीगोंदा, नगर एमआयडीसी येथे याच पद्धतीने गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे, पोलीस हवालदार रविराज कोकरे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, मंगेश थोगळे, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, योगेश नागरगोजे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भुजबळ यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.