कोंढवा पोलिसांची कामगिरी : आरोपीवर तीन गुन्हे दाखल असून, मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला कोबिंग ऑपरेशनदरम्यान जेरबंद केले. आरोपीवर कोंढवा, बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.
रमिज रियाज सय्यद (वय २७, रा. गोसुलवारा मस्जिदजवळ, आश्रफनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीचा कोबिंग ऑपरेशनदरम्यान आरोपी सोमजी चौकात रात्री थांबला असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी आरोपीकडे दाखल गुन्ह्यातील मोबाईल मिळून आला, तो जप्त केला. आरोपीने आणखी मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे गुन्हे आणि त्याच्या दोन साथीदाराचा पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपीने कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीवर तीन गुन्हे दाखल असून, मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघड झाला आहे.
पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, अंमलदार सहायक पोलीस फौजदार असगरअली सय्यद, अमोल हिरवे, योगेश कुंभार, गणेश चिंचकर, दीपक जडे, अमोल हिरवे, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करीत आहेत.
