आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रेम प्रकरणातून चिमुकल्याचे अपहरण ; तीन तासांत सुटका

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 4, 2022
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या : भांडणातून आरोपीने केले कृत्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांना तीन तासांत बेड्या ठोकल्या. ही घटना 2 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर येथे घडली होती. पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करुन त्याला आईच्या ताब्यात दिले.

ज्योती धनराज साळुंखे (रा. पवननगर, शनिमंदिरा जवळ, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी स्वप्नील रमेश शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेचा मुलगा निरज हा सायंकाळी घरासमोर खेळत असताना आरोपी स्वप्नील शिंदे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने दुचाकीवरुन पळवून नेले. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच चार पथके तयार करुन बिबवेवाडी, मार्केटयार्ड व स्वारगेट परिसरात मुलाचा शोध सुरु केला. दरम्यान पोलिसांनी आरोपी स्वप्नील शिंदे याच्या घरच्यांकडे आणि मित्रांकडे त्याची चौकशी करुन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरु केला. मुलाचा शोध घेत असताना काकडेवस्ती येथे अंधारात पार्क केलेली वाहने पोलीस तपासत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस नाईक देवकते, पोलीस हवालदार देशमाने यांना एका रिक्षामध्ये आरोपी हा एका लहान मुलासह बसलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपी आणि अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले.

आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने मुलाच्या आईसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मुलाचे अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. मुलाची आई एका मॉलमध्ये काम करत असून ती एकटीच या मुलाचा सांभाळ करते. आरोपी याने दुपारपासून पाळत ठेवून मुलाला घरासमोर खेळत असताना त्याला चॉकलेट देऊन दुचाकीवरुन पळवून नेले होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे,
पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व तपास पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली.