हडपसर-भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : पोलीस स्टेशनशेजारी होतात चोऱ्या
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या ९० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. भारती विद्यापीठ आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कात्रज-स्वारगेट दरम्यान पीएमपी बसमध्ये प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाच्या बॅगची चेन उघडून २० हजार रुपये किमतीच्या सोन्याची पाटली चोरून नेली. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ही चोरीची घटना घडली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे पुढील तपास करीत आहेत. दुसरी घटना हडपसर गाडीतळ बसथांब्यावर ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी घडली. प्रवासी महिला जेजुरी बसमध्ये चढत असताना चोरट्याने पर्सची चेन उघडून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पी. बी. सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस स्टेशनशेजारी होतात चोऱ्या…
कोरोनाचा ज्वर कमी झाला आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. त्यामुळे पीएमपी बसमध्ये प्रवाशांची गर्दी होऊ लागल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दागिने आणि पाकिट चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. पोलीस स्टेशनच्या शेजारी चोरी होत असूनही पोलिसांना चोरट्याचा सुगावा का लागत नाही, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले, तरी तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याने अनेक प्रवासी तक्रार देण्यास धजावत नाहीत.
