अलंकार पोलिसांची कामगिरी : ११ गुन्हे उघड, १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाहनचोरी करणाऱ्या तीन सराईतांच्या अलंकार पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून वाहन चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आले असून, 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला पंढरपूर येथून अटक करण्यात आली आहे.
उमेश विठ्ठल पवार (वय-32 रा. मु.पो. मुंगशी वाळुज, ता. बार्शी, जि. सोलापूर), साहील गुलाब ठोंबरे (वय-18 रा.इंगळे नगर, आरंभ सोसायटीजवळ, भुगाव, पुणे), श्री गणेश वाघमारे (वय-20 रा. कदम वस्ती, राहुलनगर, शिवणे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना उमेश पवार हा पंढरपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे शहरात प्रवासाकरीता अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 6, हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 1 आणि डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 असे 10 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर साहील ठोंबरे आणि वाघमारे या दोघांना वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करुन चोरलेली दुचाकी जप्त केली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे, पोलीस अंमलदार सागर केकाण, निशीकांत सावंत, धिरज पवार, हरीष गायकवाड, शरद चव्हाण, आशिष राठोड, शशीकांत सपकाळ, नितीन राऊत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
