विमानतळ पोलिसांत गुन्हा : मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याने प्रचंड खळबळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अनैतिक संबंधाला नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.७) उघडकीस आली. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून पळ काढला आहे.
गुलाम मोहम्मद शेख (वय-30 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार) याच्याविरुद्ध विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले की, लोहगाव येथील मोझेआळी परिसरातील आरोपी गुलाम हा मयत महिलेच्या घरामध्ये भाड्याने राहात होता. दरम्यानच्या काळात त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब मयत महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर खाली करण्यास सांगितले. रविवारी (दि.7) दुपारी महिला घरामध्ये एकटी असताना आरोपी गुलाम हा घरी आला. त्याने तिचा बाथरुममध्ये गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर आरोपी महिलेच्या घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेला. महिलेचा पती आणि मुले कामावरुन घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. त्यांनी तिला संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मयत महिलेच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्याविरोधात अनैतिक संबंधांना नकार दिल्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.
