आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 12, 2022
Spread the love

सिंहगड पोलिसांत फिर्याद : जोडीदार पाहणाऱ्या १८ वर्षांच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला फसविले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आयुष्यभर काम केल्यानंतर आता उतार वयात जवळ कोणी नाही. अशावेळी काळजी घेणारे कोणी असावे, या भावनेतून त्यांनी ८१ व्या वर्षी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लग्नासाठी स्थळ दाखविण्याची फी म्हणून विविध कारणे सांगून तब्बल ९५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी धायरी येथे राहणार्‍या ८१ वर्षाच्या वृद्ध नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कुलस्वामीनी विवाह मंडळ-शोभा साखरे, भाग्यलक्ष्मी विवाह मंडळ-वर्धा, मंजू पवार, स्वयंवर विवाह मंडळ, अंकीता भोसले / साळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी निवृत्त लष्कर अधिकारी आहेत. ते घरात एकटेच असतात. त्यांचा सांभाळ करायला कोणी नाही. उतार वयात आपली देखभाल करण्यासाठी कोणीतरी जोडीदार असावी, या हेतूने त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी मुलींसाठी विवाह मंडळाशी संपर्क साधला. तेव्हा या विवाह मंडळातील महिलांनी त्यांना लग्नासाठी स्थळ पाहण्याचे सांगून त्यासाठी फी म्हणून व संबंधित महिलांनी विविध खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ९५ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र, कोणतेही स्थळ न दाखविता फसवणूक केली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करीत आहेत.