आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणारा चोरटा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 12, 2022
Spread the love

कोंढव्यातील थरार ! : पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांनी धाडसाने पकडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोंढव्यातील सराफ दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही धाडसाने एका पोलीस अंमलदाराने झडप घालून त्याला पकडले. पिस्तुल घेऊन पळून जाणार्‍यास पकडणारे पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांचे कौतुक केले जात आहे.

सौद असिफ सय्यद (रा. फैजाना मस्जिदजवळ, मिठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील आंबेडकर नगरमधील अरिहंत ज्वेलर्समध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

याप्रकरणी मुकेश ताराचंद गुगलिया (वय ५०, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

कोंढवा पोलिसांनी सांगितले की, गुगलिया यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते व त्यांचा कामगार शुभम हे दुकानात बसलेले असताना दुचाकीवरुन सौद सय्यद व रुहान खान हे दोघे आले. त्यांनी दुकानदाराला बाहेर पडता येऊ नये, म्हणून दुकानाचे शटर बंद केले आणि गुगलिया यांच्याकडे पैसे व सोने काढून देण्याची मागणी करु लागले. गुगलिया यांनी ते न दिल्याने त्याने त्याच्याकडील पिस्तुलामधून एक गोळी झाडली. या गोळीचा आवाज ऐकून दुकानाबाहेर गर्दी जमली. तेव्हा दोघेही चोरटे आरडाओरडा करीत व पिस्तुलाचा धाक दाखवून पळून जाऊ लागले. त्याच वेळी पोलीस अंमलदार अंकुश केंगले हे गस्त घालत येत होते. दुकानापासून सुमारे १०० मीटर अंतरावर चोरटे पळून चालले होते. अंकुश केंगले यांच्यासमोर सौद हा पिस्तुल घेऊन येत होता. तरीही न डगमगता त्यांनी झडप घालून त्याला पकडले. या गडबडीत त्याचा साथीदार पळून गेला.

दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर व अन्य पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकुश केंगले यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.