सहकारनगर पोलिसांची कारवाई : बसचालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पकडण्यात यश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्यांना बसचालकाच्या सतर्कतेमुळे सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून 64 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १२) करण्यात आली.
अक्षय दत्ता जाधव (वय-22 रा. मुंढवा), राहुल इश्वर सिद्धपुर (वय-27 रा. मुंढवा), महिला आरोपी नीला सचिन गायकवाड (वय-33 रा. मुंढवा मुळ- रा. अंबरनाथ ठाणे), नंदा महादेव गायकवाड (वय-37 रा. मुंढवा मुळ- रा.सलगर वस्ती, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी शीतल लहु पांगारकर (वय-30 रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शीतल पांगारकर या शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास टिळक रोडवरील हिराबाग बस स्टॉप ते बालाजीनगर असा कोथरुड बस डेपो ते कात्रज या पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. बस सातारा रोड येथील शंकर महाराज मठाजवळ आली असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करुन जबरदस्तीने गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे 1 तोळा वजनाचे मंगळसुत्र आणि पर्समधील 4500 रुपये चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी व बसमधील इतर प्रवाशांनी आरडाओरडा केला.
प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून बस चालकाने बसची दोन्ही दारे बंद करुन बस सहकारनगर पोलीस ठाण्यात नेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर तपास पथकाने बसमधील 50 ते 60 प्रवाशांचे ओळखपत्र पाहून चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून फिर्यादी महिलेचे चोरलेले मंगळसुत्र आणि पैसे तसेच 4 महागाडे मोबाईल, 1 कटर, मोबाईल पीन असा एकूण 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक गुन्हे युनुस मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, अनिल माने, पोलीस हवालदार बापु खुटवड, अमोल गुरव, सोपान नावडकर, पोलीस नाईक महादेव नाळे, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर, सागर सुतकर, शिवा खेड, महिला पोलीस हवालदार सुरेखा अनपट, मनीषा कारंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
