आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्टेट बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : व्हिसासाठीच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन एक कोटींचे काढले कर्ज

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : व्हिसा काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन त्यांच्या खोट्या सह्या करुन बँक मॅनेजरनेच इतरांशी संगनमत करुन तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज काढून एका नागरिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेत जानेवारी २०१८ ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला.

पुष्कर टापरे (रा. लॉ कॉलेज रोड), पुष्कर वांगीकर आणि स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेचे व्यवस्थापक प्रमोद कुलकर्णी (रा. बावधन) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वडगाव येथील सनसिटी रोडवर राहणाऱ्या एका ५३ वर्षाच्या नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी सोबत ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी व्हिसा काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन फिर्यादीच्या खोट्या सह्या केल्या. खोटे दस्तऐवज तयार केले. स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रमोद कुलकर्णी व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी फिर्यादीच्या नावे कर्ज खाते तयार केले. त्यावर दोन मिनी कूपर चारचाकी घेण्यासाठी प्रत्येकी ५२ लाख रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी ४ लाख रुपयांचे कर्ज काढले. आपल्या कागदपत्राचा गैरवापर करुन अशा प्रकारे कर्ज काढल्याची कोणतीही माहिती फिर्यादींना माहिती नव्हती. त्यांच्या खात्यातून ३ लाख ५३ हजार ७०० रुपये वजा झाले. तेव्हा त्यांनी हे पैसे कशासाठी वजा झाले, याची चौकशी केल्यावर हा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे अधिक तपास करीत आहेत.