आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022
Spread the love

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : 15 लाख रुपये किमतीचे 70 मोबाईल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात मोबाईलवर बोलत असलेल्या नागरिकांचे जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या टोळीकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 70 अँड्रॉइड फोन जप्त करून पाच जणांना अटक केली आहे.

विकास वाघेरे (वय-22 रा. अशोकनगर, येरवडा), अनिकेत लक्ष्मण कांबळे (वय-20 रा. येरवडा), एलिसन विल्सन पिल्ले (वय-19 रा. शास्त्रीनगर, घोरपडी गाव, पुणे), तेजस गुलाब बाटे (वय-27 रा. किरकिटवाडी, सिंहगड रोड, पुणे), निखील रामा पुजारी (वय-28 रा. डोबरवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत मधुकर नेवे (रा. रिंग रोड, भुसावळ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांचा मुलगा गौरव नेवे हे ४ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथून पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते. सकाळी सातच्या सुमारास गौरव हा रेल्वे स्टेशन येथून हडपसर येथील नातेवाईकांडे जाण्यासाठी ओला बुक करत असताना दुचाकीवरुन दोघे जण आले. मागे बसलेल्या व्यक्तीने गौरवच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला. याप्रकरणाचा सखोल तपास करुन पोलिसांनी विकास वाघेरे आणि अनिकेत कांबळे यांना अटक करुन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांचे साथिदार एलिसन, तेजस आणि निखील यांची नावे निष्पन्न झाली. त्यांना गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडून चोरीचे 20 मोबाईल जप्त केले. पोलिसांनी आरोपींकडे गुन्ह्याची पद्धत व चोरी केलेल्या मोबाईल बाबत चौकशी केली. आरोपींनी पुणे शहरातील विविध भागातून मोबाईल चोरल्याचे सांगितले. तसेच चोरलेले मोबाईल डोबरवाडी येथील निखिल पुजारी याच्याकडे दिल्यानंतर तो त्याचा साथिदार शिवा पुजारी याला विकत होता. शिवा पुजारी हा चोरीचे मोबाईल फोन हे गुजरात येथील कासिम नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या ठिकाणी कुरियर द्वारे मुंबई, अहमदाबाद व त्यानंतर कोलकाता येथील हस्तकाकडे पाठवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिवा पुजारी याला 10 फेब्रुवारी रोजी हडपसर येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता. त्याने काही वेळापूर्वीच कुरिअरने 50 मोबाईल फोन मुंबईला पाठवल्याचे सांगितले. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करुन चोरीचे 50 मोबाईल फोन जप्त केले. बंडगार्डन पोलिसांनी या कारवाईत एकूण 15 लाख रुपयांचे 70 मोबाईल जप्त करुन 5 जणांना अटक केली आहे. तर 17 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार मोहन काळे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, सचिन भिंगारदिवे, अमोल सरडे, संजय वणवे, सागर घोरपडे, किरण तळेकर, अंकुश खानसोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.