आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 17, 2022
Spread the love

खडकी पोलिसांत फिर्याद : माझ्यावर 307 केली होती ना, आता विकेट काढतो’

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ‘‘तुझ्यामुळे मी ३ महिने जेलमध्ये गेलो, तु माझ्यावर ३०७ केली होती. आता तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेट काढतो, ’’असे म्हणून एका सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. ही घटना बोपोडीतील शिवाजी गार्डन येथील गंगाम्मा चायनीजजवळ सोमवारी रात्री अकरा वाजता घडली.

रोहित गद्रे (रा. दापोडी) व त्याचे दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक तुकाराम मोरे (वय ३०, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकी पोलिसांनी त्याच्यावर दुसर्‍यांदा खूनाचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्यांचा मित्र निखिल गायकवाड हे शिवाजी गार्डन येथील गंगाम्मा चायनिजजवळ गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा रोहीत गद्रे हा त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. तो फिर्यादीला म्हणाला की, ‘‘माझ्याकडे काय बघतो. तुझ्यामुळे मी तीन महिने जेलमध्ये गेलो. तू माझ्यावर ३०७ केली होती ना. तुला मस्ती आली आहे ना. तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेट काढतो,’’ असे बोलून त्याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. सुदैवाने फिर्यादीने डावा हात मध्ये घातल्यामुळे कोयत्याने डाव्या हाताला जखम झाली. इतर आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. कोयते हवेत फिरवून मोठ मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.