आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शैक्षणिक शुल्क परत मिळवून देण्याच्या आमिषाने २५० जणांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 18, 2022
Spread the love

बांदलच्या अटकेनंतर प्रकरणे उघड : तिरुपती कॉर्पोरेशनच्या विकास बांदल, कॅशियर विलास पाटीलवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सरकारकडून शैक्षणिक शुल्क परत मिळवून देतो, तसेच व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, अशी विविध कारणे सांगून सुमारे अडीचशेहून अधिक लोकांची २० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ दरम्यान कात्रज बायपास रोडवरील ओमकार नंदन इमारतीत घडला.

सिंहगड रोड पोलिसांनी तिरुपती कॉर्पोरेशनचा संचालक विकास रघुनाथ बांदल (वय ३५, रा़. नर्‍हे आंबेगाव) आणि कॅशियर विलास वामन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रवींद्र हरीश्चंद्र जाधव (वय ४९, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली.

पिपंरी चिंचवड पोलिसांनी विकास बांदल याला अटक केल्यानंतर आता त्याचे एक एक कारनामे बाहेर येत आहेत. विकास बांदल याने ओमकार नंदन इमारतीत कार्यालय थाटले होते. केंद्र सरकारची शैक्षणिक फी परत करण्याची योजना आहे, असे सांगून जाधव यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांना फ्रेंचायजी घेण्यास भाग पाडले. सरकारकडून विद्यार्थ्यांचे फीचे पैसे मिळवून देतो, असे सांगितले. जाधव यांनी डिपॉझिट म्हणून ३ लाख ८५ हजार रुपये दिले. तसेच ३१ विद्यार्थ्यांकडून १ लाख ९१ हजार ३६० रुपये दिले.

फिर्यादीच्या मुलांची शैक्षणिक फी माफ होण्यासाठी ९ हजार ९६० रुपये दिले होते. अनेक महिने वाट पाहिल्यानंतरही त्याने फी मिळवून दिली नाही. तसेच त्यांचे डिपॉझिट म्हणून दिलेले पैसे परत करण्यासाठी चेक दिला. तो बँकेत पैसे नसल्याने परत आला. विकास बांदल याने बिबवेवाडी येथील बेटी आशा केंद्र यांच्यामार्फत १५९ महिला व पुरुषांकडून भरलेली शैक्षणिक फी परत मिळवून देतो, असे सांगून प्रत्येकाकडून ५ हजार ९८० रुपये असे एकूण ९ लाख ५० हजार ८२० रुपये घेतले. गरीब व गरजू महिलांना व्यवसायासाठी प्रत्येकी १ लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच संस्थेतील ७० ते ८० महिलांकडून २ लाख ६२ हजार ५०० रुपये घेतले. कोणालाही शैक्षणिक फी ची रक्कम तसेच कर्ज मिळवून न देता सर्वांची मिळून २० लाख ६८ हजार ५१० रुपयांची फसवणूक केली.

गेल्या काही दिवसांपासून विकास बांदल हा फरार झाला होता. त्याने आकुर्डी येथे अशाच प्रकारे कार्यालय स्थापन करुन तेथेही शैक्षणिक फी परत मिळवून देतो, कर्ज मिळवून देतो, तसेच कोवीड – १९ मुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत मिळवून देतो, अशी वेगवेगळी कारणे सांगून लोकांकडून पैसे घेऊन लाखो रुपयांचा गंडा घातला होता. निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. निगडी पोलिसांनी विकास बांदल याचा शोध घेऊन त्याला शहापूर टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर आता त्याने फसवणूक केलेले लोक पुढे येत आहेत.