आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कबुतर चोरल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाला मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 18, 2022
Spread the love

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना : सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कबुतर चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला बॅट आणि पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा सर्व प्रकार मारहाण करणाऱ्या मुलांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार बुधवारी (दि.16) दुपारी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रात्री उशिरा पालकांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली. येरवड्यातील गोल्फ क्लब जवळ असणाऱ्या औद्योगिक वसाहतीसमोरच्या पुणे महापालिकेच्या अनुसयाबाई सावंत शाळेच्या आवारात हि घटना घडली. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन बालकाला इतर दोन मुले कबूतर चोरल्याच्या वादातून पट्ट्याने व बॅटने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने काढला.

बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी जखमी मुलाची वैद्यकीय तपासणी करुन अहवाल मिळाल्यानंतर गुरुवारी (दि.17) सकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मारहाण झाल्यानंतर पीडित मुलाने घरच्यांना याबाबत काहीच सांगितले नाही. मात्र, ज्यावेळी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर हा सर्व प्रकार घरच्यांच्या समोर आला. या गंभीर प्रकरणानंतर पुणे महापालिका शाळांच्या आवारातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणात येरवडा पोलीस कोणता गुन्हा दाखल करतात हे पहावे लागले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.