हडपसर पोलिसांची कामगिरी : सात गुन्हे उघड करून १३ लाखाचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरामध्ये बंद घराचे कडी कोयंडे तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 7 गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या सोनाराकडून सोन्याचे आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
अर्जुन अशोक पाटील (वय ३१, रा. स.नं.१०६, महाकाली मंदीराशेजारी, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे), विजय सुभाष देशमाने (रा. मु.पो. राऊतवाडी, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अनिलकुमार जग्गाराव बेदालम (रा. स्वप्नपुर्ती सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अनिलकुमार बेदालम हे १० फेब्रुवारी रोजी कुटुंबासह बालाजी दर्शनासाठी गेले होते. ते घरी आले असता त्यांच्या घरातून दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती हडपसर पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणातून केला जात असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, निखील पवार व सचिन जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हडपसर पोलीसांनी आरोपी अर्जुन अशोक पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशीदरम्यान त्याने त्याचा साथीदार आकाश लाकरे याच्या मदतीने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 15 हजार रुपये किंमतीचे 165 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
दरम्यान, हडपसर येथील काळेपडळ परिसरातील केतकेश्वर कॉलनीमध्ये उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करुन चोरट्यांनी घरातील दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट-५ने आरोपी विजय देशमाने याला पकडून हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले सोने सोनार अक्षय श्रीनीवास दिक्षीत (वय-25 रा. विश्वकर्मा पतसंस्था शेजारी सर्वे नंबर १११/१३/ब ओमकार कॉलनी, विजयनगर काळेवाडी पिंपरी, पुणे) याला दिल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सोनार अक्षय दिक्षीत याच्याकडून 6 लाख 3 हजार 500 रुपये किमतीचे 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 35 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले.
हडपसर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये दोघांना अटक करुन सात गुन्हे उघडकीस आणले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १३ लाख १८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अमलदार, प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ निखील पवार, प्रशान टोणपे रियाज शेख, सचिन गोरखे सुरज कुमार यांच्या पथकाने दमदार कामगिरी केली.
