आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बेपत्ता तरुणीचा दोन वर्षानंतर सापडला सांगाडा!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 19, 2022
Spread the love

तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड : कुटुंबानेच मृतदेह पुरल्याचे पोलीस तपासात आले समोर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा सांगाडा पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. २०२० मध्ये तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार घोडेगाव पोलिसात देण्यात आली होती. त्यानंतर, सहा महिन्यांनी तरुणीचा सांगाडा तिच्या कुटुंबाला आढळला होता. मात्र पोलिसांना याची माहिती न देताच त्यांनी तो जमिनीमध्ये पुरला होता. तर, तरुणीने आत्महत्या केली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सखुबाई घोडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२० मध्ये सखुबाई ही १७ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. त्यानुसार घोडेगाव पोलिसांत अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, तरुणीने घोड नदीच्या परिसरात आत्महत्या केली होती. तिचा सांगाडा सहा महिन्यांनी तिच्या कुटुंबाला आढळला होता. त्यांनी तो त्याच परिसरातील जंगलात पुरला होता. असे पोलीस तपासात पुढे आले आहे.

याची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबाने घोडेगाव पोलिसांना दिली नव्हती. याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच कुटुंबियांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सखुबाईचा मृतदेह त्याच परिसरात पुरल्याच उघड झाले. त्यानुसार, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकाने जंगलातील तो सांगाडा शोधून काढला आहे. दोन वर्षानंतर सखुबाईचा सांगाडा तर सापडला आहे परंतु तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याचं गूढ घोडेगाव पोलीस उलगडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.