आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कात्रज परिसरातील खुनातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 21, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : जेजुरी येथील मामाच्या घरून घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज-निंबाळकरवाडी परिसरात शुक्रवारी (दि.18) सायंकाळी खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-२ने भोसलेवाडी (जेजुरी) येथून अटक करून मुसक्या आवळल्या. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

समीर बापू निंबाळकर (वय-31 रा. महालक्ष्मी मंदिर जवळ निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. दशरथसिंग राजपुत (रा. सणसनगर स्मशानभूमीजवळ निंबाळकरवाडी कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर निंबाळकर हा त्याच्या जेजुरी येथील भोसलेवाडी येथे राहणारा मामा सोमनाथ भोसले यांच्याकडे असल्याची माहीती गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सोमनाथ भोसले यांच्या घराच्या मागे लपून बसलेल्या आरोपी समीरला ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, मयत दशरथसिंग राजपुत हा दारु पिऊन नेहमी वडिलांना शिवीगाळ करत होता. याच रागातून त्याचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले. शुक्रवारी (दि.18) सायंकाळी तो सुमती बालवन शाळेच्या मागे थांबलेला दिसला. त्याला जोरात ढकलून खाली पाडून त्याला लोखंडी वस्तूने डोक्यात मारुन जखमी केल्याचे आरोपीने सांगितले. आरोपीला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पठाण, पोलीस अंमलदार संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, चंद्रकांत महाजन, निखील जाधव, समिर पटेल, मितेश चोरमोले, नवनाथ राख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.