सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : पोस्कोअंतर्गत दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावल्यानंतर घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणाच्या पोस्कोअंतर्गत दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलविलेल्या कुटुंबाने वडगाव पोलीस चौकीत राडा घातला. एवढ्यावरच न थांबता पोलिसांच्या अंगावर धावून गेले. तेथील तपासाची कागदपत्रे फाडून टाकली.
स्वत:लाच मारहाण करुन शिवीगाळ करुन ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हा प्रकार वडगाव पोलीस चौकीत शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडला.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवींद्र संताराम उन्हाळे (वय ३२) आणि रामदास संताराम उन्हाळे (वय ३८, रा. वडगाव धाबाडी) यांना अटक केली आहे. तर, पूनम रवींद्र उन्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांच्याकडे पोक्सो अंतर्गत एका गुन्ह्याचा तपास सुरु आहे. त्या गुन्ह्यातील चौकशीसाठी त्यांनी उन्हाळे कुटुंबाला बोलाविले होते. उन्हाळे हे भाजी विक्रेते आहे. त्याप्रमाणे हे तिघे चौकशीसाठी वडगाव पोलीस चौकीत आले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला कशाला बोलावले. आमचा काही संबंध नाही, असे म्हणत चौकीत गोंधळ घातला. पोलीस शिपाई माळी यांच्या अंगावर धावून धक्का देऊन त्यांच्या हातातील कायदेशीर व गोपनीय गुन्ह्यांचे तपासाचे कागद फाडून टेबलावरील कागदपत्रे फेकून देऊन शासकीय कामात अडथळा आणला. त्यानंतर तिघेही स्वत:लाच मारहाण करु लागले. अर्वाच्च भाषेत बोलून, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व आंदोलन करण्याची धमकी दिली, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
