आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 21, 2022
Spread the love

शिरवळमध्ये प्रचंड खळबळ – शिरवळ पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज परिसरातील मटका व्यवसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील फुलमळा परिसरातील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

संजय सुभाष पाटोळे (वय ३६, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या मटका व्यावसायिकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, संजय पाटोळे हा मटका किंग म्हणून प्रसिद्ध होता. तो कामासाठी बाहेर जात असल्याचे सांगून रविवारी सकाळी ७ वाजता पुण्यातील घरातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर एक जण होता. त्यानंतर शिरवळ येथील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास इमारतीत राहणारी एक महिला गेली. तेव्हा तेथे तिला एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिने हा प्रकार पतीला सांगितला. पतीने याची माहिती पोलिसांना कळविली. शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाच्या खिशात आधार कार्ड आढळून आले. त्यावरुन ती व्यक्ती संजय पाटोळे असून ती पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली. या इमारतीच्या खालीच संजय पाटोळे याची गाडी उभी होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याचे नातेवाईक शिरवळला पोहचले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

लेक पॅलेस ही जुनी इमारत असून तेथे सर्व लोक रहायला आले आहेत. संजय पाटोळे याची गाडी इमारतीच्या बाहेर पार्क केली होती. इमारतीमध्ये त्याच्या ओळखीचे कोणी नाही. कोणीतरी त्याला इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले. तेथे त्याच्यावर अगदी जवळून गावठी कट्ट्यातून गोळी झाडून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे. पुढील तपास सुरू आहे.