आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गर्भ पाडून टाक असे सांगत लग्नास नकार देणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : लग्नाच्या आमिषाने ठेवले शारीरिक संबंध

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१९ पासून ५ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुधीर अर्जुन बंकपल्ली (वय ३५, रा. अ‍ॅमेनोरा पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे अ‍ॅमेनोरा पार्क या मोठ्या सोसायटीत राहतात. सुधीर बंकपल्ली याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचा वडिलाप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या. याची माहिती तिने सुधीर व त्याच्या आईवडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी फिर्यादीला तू तुझा गर्भ पाडुन टाक. तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर तसे केले नाही तर तुला व तुझ्या मुलाला आम्ही जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.