आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील आरोपीला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई : मोक्का गुन्ह्यात चार वर्षापासून पोलिसांना देत होता गुंगारा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील मोक्का गुन्ह्यातील पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखा युनिट-३च्या पोलिसांनी रविवारी (दि.२०) नानंज (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे अटक केली.

दिपक रमेश आमले (वय २९, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डन शेजारी, कोथरूड, सध्या रा. नांनज, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी दिपक आमले याच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असून, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. चार वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक आमले हा नांनज येथील शेतात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस अंमलदार टेकावडे व पडवाळ यांच्या पथकाने ही दमदार कारवाई केली.