आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मटका किंगची ‘गेम’ करणारे सहाजण गोत्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

पोलिसांची दमदार कामगिरी – पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपीला ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज परिसरातील मटका व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून खून करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आर्थिक वादातून हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी खुनाचा उलगडा करीत आरोपींना अटक केली. पोलिसांनी दमदार कामगिरी करत आरोपींना पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.

तरबेज मेहमूद सुतार (वय 31, कात्रज, पुणे), किरण बबनराव साळुंखे (रा. आंबेगाव), विकी राजेंद्र जाधव (रा. वानवडी), शंकर उर्फ तात्या आश्रुबा पारवे (रा. बिबवेवाडी), नितीश उर्फ रित्या सतीश पतंगे ( रा. बिबवेवाडी) आणि राकेश सुरेश गायकवाड (रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, संजय सुभाष पाटोळे (वय 36, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या मटका व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना फुलमळा (ता. खंडाळा) परिसरातील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर घडली होती. मृत मटका किंगच्या खिशातील हॉटेलच्या बिलावरुन शिरवळ पोलिसांनी खूनाचा उलगडा केला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

सर्व आरोपींना शिरवळ पोलीस ठाण्यात आणले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. मृत संजय पाटोळे आणि मुख्य सूत्रधार यांच्यामध्ये आर्थिक देवाण – घेवाण आणि जमिनीच्या कारणावरुन वाद होते. दोघांनीही एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच कारणावरुन आरोपी तरबेज याने आपल्या साथिदारांच्या मदतीने संजय याचा खून केला. आरोपींनी संजय याच्या डोक्यात गोळी झाडून खून केला. मात्र शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्यात गोळी आढळून आली नाही. गोळी मृताच्या नाकातून आरपार निघून बाजूच्याच एका ओढ्यात पडली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

हॉटेलच्या बिलावरुन उलगडलं गूढ…

संजय पाटोळे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पंचनामा करताना पोलिसांना मृताच्या खिशात एका हॉटेलच्या बिलाची पावती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी मृत संजय याच्यासोबत काही आरोपी जेवण करताना दिसून आले. त्यातील एक सराईत गुन्हेगार असल्याचे समजलं. त्यानुसार पोलिसांनी पुण्यातील विविध भागातून आरोपींना अटक केली.