आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिस आयुक्तांच्या इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 26, 2022
Spread the love

उपायुक्तांच्या विशेष पथकाची जुगार अड्ड्यांवरील 32 जणांवर कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सुमारे 2 आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत दिल्यानंतरही येरवडा परिसराच्या हद्दीत जुगाराचे अवैध धंदे सुरु असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या कार्यालयातील पथकाने या दोन ठिकाणी छापा मारुन तब्बल 32 जणांवर कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शहरात अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मिटिंगमध्ये दिले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी पुन्हा या आदेशाची आठवण करुन दिली. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येतील, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी कारवाईदेखील केलेली आहे.

येरवडा येथील कंजार भाट वस्तीतील सनी माछरे याच्या कॅरम हाऊसच्या वरील बंदिस्त खोलीमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती शनिवारी (दि. 19 फेब्रुवारी) पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने तेथे छापा घातला. तेव्हा तेथे तब्बल 19 जण फ्लॅश पत्याचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी या 19 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 7 मोबाईल, 14 हजार 340 रुपये रोख असा एकूण 24 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आठवडयाभरापूर्वी झालेल्या कारवाईची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. अखेर त्या कारवाईची माहिती बाहेर पडलीच.

या कारवाईनंतर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मी लॉन्सजवळ जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती तीन दिवसांपुर्वी उपायुक्त रोहिदास पवार यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा घातला. तेथे 13 जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 24 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

परिमंडळ 4 च्या हद्दीत कोठे अवैध धंदे सुरु असल्याची माहिती मिळाल्यास त्यानुसार उपायुक्ताच्या कार्यालयातील पथक तेथे जाऊन कारवाई करत आहे. येरवडा व विमानतळ पोलीस ठाणे यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसात 2 कारवाया करण्यात आल्या. यापुढे कोठे अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यावर तेथे हे पथक कारवाई करेल, असे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

get_footer();