पुणे ग्रामीण विशेष पथकाची कारवाई : मारुती युको वाहनासह सुमारे चार लाखाचा माल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : माळेगाव (ता. भोर, जि. पुणे) येथील नसरापूर-वेल्हा रोड नजिक गावठी हातभट्टी दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण विशेष पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून मारुती युको वाहनासह सुमारे चार लाखाचा माल हस्तगत केल्याची माहिती पुणे ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
निरंजन हनुमंत शेटे (वय ३२) आणि हनुमंत नथुराम शेटे (वय ५५, दोघेही रा. नसरापूर, शेटे आळी, ता. भोर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ नसरापूर परिसरात एमएच-१२-१३२९ या नंबरचे मारुती इको या वाहनामधून बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू वाहतुक व विक्री होत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी सायबर पोलीस स्टेशनकडील विशेष पथकाला कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या. सायबर पोलीस स्टेशनचे विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड, सचिन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत नसरापूर-वेल्हा रोड परिसरात सापळा रचून गावठी हातभट्टीची दारू वाहतुक व विक्री करीत असलेल्या दोघांना ताब्यात घेत मारुती इको एमएच-१२ एन.पी. १३२९ यासह ताब्यात गावठी हातभट्टी तयार दारू व वाहनासह एकूण किं. ४,००,८००/- (चार लाख आठशे) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
दोन्ही आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल हा पुढील कारवाईसाठी राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला. आरोपींविरूध्द भा.दं.वि. कलम ३२८ सह मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींनी गावठी दारु कोठून आणली? त्यांचे आणखीन कोण साथीदार आहेत? याबाबतचा अधिक तपास करण्यासाठी अटक आरोपींना भोर येथील कोर्टात हजर केले असता कोर्टाने एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व सहा.फौजदार संजय ढावरे हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड, सचिन गायकवाड व सुनिल कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
