आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बापरे… शिक्षिकेवर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 1, 2022
Spread the love

भोसरी पोलिसांत फिर्याद : एकट्या महिलेच्या असह्यतेचा घेतला फायदा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुलीसोबत एकट्या राहणाऱ्या शिक्षिकेवर चक्क पोलिसानेच बलात्कार केल्याचा अघोरी प्रकार समोर आला. एवढेच नाही तर गरोदर राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत साखरेवस्ती, भोसरी आणि हिंजवडी फेज वन येथे घडला. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच लैंगिक शोषण केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आकाश प्रकाश पांढरे (वय – 30) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका प्रा. महिलेने (वय २८) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आकाश पांढरे हा पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याने पीडित महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित 28 वर्षीय महिला ही त्यांच्या मुलीसोबत भोसरी परिसरात राहतात. त्या एकट्या राहत असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपी आकाश याने आपण पोलीस असल्याचे सांगून महिलेला धमकावले. तू एकटी कशी राहतेस बघतो असे म्हणून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार शारीरिक संबंध व अनैसर्गिक संबध ठेवले. महिला गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला घालून गर्भपात केला. असे फिर्यादीत म्हटले आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम करीत आहेत.