आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 1, 2022
Spread the love

पुणे कोर्टाने सुनावली : वेल्हे तालुक्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये घडली होती घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील नराधमाला सोमवारी (दि.28 फेब्रुवारी) जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. अशी माहिती सरकारी वकील विलास पठारे यांनी दिली.

संजय बबन काटकर (वय-28 रा. कादवे, ता.वेल्हा) असे फाशी झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, हा प्रकार पुणे ग्रामिण पोलीस दलातील वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. 15 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे जिल्ह्यातील कुरण खुर्द गावात घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, मालखेड थोपटेवाडी (ता. हवेली) रस्त्यावरील एका पुलाखाली चिमुरडीचा मृतदेह पोलिसांना सापडला. अहवालातून चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली.

आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना हा गुन्हा संजय बबन काटकर याने केला असून तो नाटे (जि. रायगड) येथील एका वीटभट्टीवर लपून बसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरण, बलात्कार, पॉक्सो, खून यासह इतर गुन्हे दाखल केले.

या गुन्ह्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली.