आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 1, 2022
Spread the love

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : परवानगी न घेताच ग्राहक अर्ज आवेदन पत्र मुख्य सचिवांकडे सादर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : फोनटॅपिंग प्रकरणात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांनी अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच, ग्राहक अर्ज आवेदन पत्र अपर मुख्य सचिव गृह यांच्याकडे सादर केले नाही. अन्यथा फोन टॅपिंगची (अभिवेक्षण) परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला कोणाचा फोन टॅप करायचा आहे याची माहिती मिळाली असती. तसेच मोबाईल वापरकर्त्यांची नावे देखील अभिवेक्षणाची व फेर अभिवेशणाची मंजुरी घेताना सादर केली नसल्याचे निष्पन्न झाले.

रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन खासदार नाना पटोले, संजय काकडे, आमदार बच्चु कडु, आशिष देशमुख यांचे मोबाईल नंबर राजकीय हेतूने जाणीवपूर्वक फसवणूक करुन अभिवेक्षणाखाली घेतले आणि हेतू पुरस्पर अभिवेशण चालू ठेवले होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यासह इतरांविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर आणि नागपूर शहर यांच्याकडील फोन टॅपिंगचे प्रस्ताव हे राज्य गुप्त वार्ता आयुक्तांमार्फत न पाठवता ते परस्पर गृह विभागाच्या मुख्य सचिवांकडे मंजुरीसाठी पाठवले जातात. फोन टॅपिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने समिती स्थापन केली. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीने 2015 ते 2019 या कालावधीतील सर्व पोलीस आयुक्तालयातील फोन टॅपिंगची पडताळणी केली. यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयात 2017 ते 2018 या दरम्यान चार लोकप्रतिनिधींचे सहा मोबाईल टॅपिंग करण्याचे तपासात समोर आले. नाना पटोले आणि बच्चु कडु यांचा 18 ऑगस्ट 2017 ते 14 नोव्हेंबर 2017 या कालावधीत फोन टॅप करण्यात आला. तर खासदार संजय काकडे यांचे दोन फोन आणि आमदार आशिष देशमुख यांचा फोन 13 नोव्हेंबर 2017 ते 9 जानेवारी 2018 या कालावधीत टॅप करण्यात आला.

नाना पटोले, बच्चु कडु व आशिष देशमुख हे अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीत गुंतलेल्या व्यक्ती असल्याचे नमूद करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विक्री करीत असल्याचे कारण सांगून फोन टॅपिंग केले. तर संजय काकडे हे कुख्यात गुंड बापू नायर टोळीचा सदस्य असल्याचे दाखवून ते अनाधिकाराने जमीन बळकाविणे, खंडणी, दरोडा असे गुन्हे संघटितपणे करीत असल्याचे म्हटले होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात संबंधितांची अगोदर चौकशी करण्यात येईल. या चौकशीतून ज्या बाबी समोर येतील. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.