सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरामध्ये टुरिस्ट गाडीतून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या परप्रांतीय टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून मुख्य सुत्रधारासह दलालला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई विमाननगर येथील ईस्ट फील्ड या हॉटेलमध्ये करण्यात आली. आरोपी टुरिस्ट गाडी असल्याचा बहाणा करुन मुली पुरवत होते.
कुलदिप प्रसाद मोहनप्रसाद महतो (वय – 26 रा. जी. बी. डोंगरीपाडा, बुद्ध विहाराजवळ, ठाणे, मुळ रा. चोपारण, ता इटकोरी, जि. हजारीबाग, झारखंड), जयशंकर प्रसाद रमेश साव (वय – 20 रा. छोटा धोबीघाट, जे. आर. बोरीया मार्ग, महालक्ष्मी इस्ट, सात रस्ता जकॅब सर्कल, मुंबई, मुळ रा. मु. सलगी, ता. जेवरा, जि. चतरा, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगर, येरवडा परिसरात दोन संशयीत व्यक्ती टुरिस्ट गाडीमध्ये फिरत असून या गाडीचा टुरीस्ट गाडी असल्याचा बहाणा करुन वेश्यागमनासाठी महिला पुरवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने संशयित व्यक्तीचा फोन नंबर प्राप्त करुन बनावट ग्राहकाला बोलण्यास सांगितले. आरोपींनी साकारे नगर विमाननगर येथे ईस्ट फील्ड या हॉटेलमध्ये दोन रुम बुक करण्यास सांगितले.
आरोपींनी सांगितल्याप्रमाणे दोन रुम बुक करुन सापळा रचला. काही वेळाने आरोपी दोन महिलांना घेऊन टुरिस्ट गाडीतून (एमएच 04 जेके 6988) हॉटेलमध्ये आले. बनावट ग्राहकाने बुक केलेल्या रुममध्ये जाताच पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन दोन मुलींची सुटका केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता परराज्यातून मुली आणून पुण्यामध्ये टुरिस्ट गाडी चालवत असल्याचे भासवून मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती आरोपींनी दिली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, महिला पोलीस हवालदार राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, पोलीस नाईक आण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.
