आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बापरे… चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 5, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांत फिर्याद : लोणकर शाळेजवळील मोकळ्या जागेत घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि.2) सायंकाळी 7.30 ते रात्री 10.30 या कालावधीत लोणकर शाळेमागील मोकळ्या जागेत घडली. याबाबत पती विरोधात गुरुवारी (दि.3) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिताम्मा किशन उर्फ कृष्णप्पा चव्हाण (वय – 35 रा. लोणकर शाळेमागे, वडगाव शेरी शेवटचा बस स्टॉप) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती किशन उर्फ कृष्णप्पा तुळप्पा चव्हाण (वय – 42 रा. रा. लोणकर शाळेमागे, वडगावशेरी शेवटचा बस स्टॉप) याच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जगन्नाथ होनबा राठोड (वय ४१, रा. मांजरी, हडपसर, मुळ रा. जि. रायचुर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी पती आणि त्याची पत्नी हे लोणकर शाळेच्या मागील बाजूस असलेल्या बाळासाहेब चांदेरे यांच्या मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या खोलीत राहतात. आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यामध्ये वाद होत होते. बुधवारी सायंकाळी याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले.

आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच तिचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. आरोपी पती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ करीत आहेत.