हडपसर पोलिसांची कारवाई : वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत दोघांना केली अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अट्टल गुन्हेगाराकडून दोन पिस्टल आणि २७ राऊंड रिक्षासह एक लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि एक लाख रुपयांची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. हडपसर पोलिसांनी दोन कारवाईमध्ये दोन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना अटक केली आहे.
सूरज व्यंकट पोतदार (वय ३२, रा. त्रिवेणी कॉलनी, संस्कार हॉलजवळ, फुरसुंगी, पुणे). तर दुसऱ्या घटनेत कोमलदेव नरीमन राठोड (वय ३३, रा. फडतरेमळा, रेल्वे क्रॉसिंग सिग्नलजवळ, फुरसुंगी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस पथक गस्त घालत असताना फुरसुंगी रेल्वे पुलाजवळ एक व्यक्ती रिक्षातून पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपीवर २०१३ ते २०२१ दरम्यान पुणे शहरात खंडणी, अपहरण, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याचे अधिक तपासात उघडकीस आले. आरोपीकडून एक गावठी पिस्टल व २२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत केला.
दरम्यान, लोणी काळभोर व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीलगत फुरसुंगीतील फडतरे मळा, रेल्वे सिग्नल क्रॉसिंगजवळ संशयावरून एका दुचाकीचालकाला तपासासाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडून २६ कॅनमध्ये ९१० लीटर गावठी हातभट्टी सुमारे ४१ हजार ६०० रुपये, तसेच युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सूरज कुंभार, अंकुश बनसोडे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
