भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : युनिट-२च्या पथकाने केली दमदार कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : टेम्पो चालकाला मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना धमकावून दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे. हा प्रकार 19 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील कात्रज येथील भारत नगर येथे घडला होता.
विकास उर्फ विकी जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजित तुकाराम दिघे (वय 35, रा. निंबाळकर वस्ती, कात्रज, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी हे टेम्पो घेऊन घरी जात होते. त्यावेळी आरोपी दयानंद सितापराव, त्याचा भाऊ सुमित सितापराव, विकी जाधव आणि त्याचे साथीदार टेम्पो समोर आडवे आले. अभिजित दिघे यांनी बाजूला होण्यास सांगितले असता आरोपींनी त्यांना लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मदत करण्यासाठी आलेल्या लोकांना ‘कोणी पुढे यायचे नाही, आम्ही इथले भाई आहे, आमचे कोणी वाकडे करु शकत नाही, कोणी पुढे आल्यास जिवंत सोडणार नाही खल्लास करु एक एकाला’ अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नी आणि मुलाचा खून करण्याची धमकी दिली.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले. या गुन्ह्यातील आरोपी विकास उर्फ विकी जाधव हा पोलिसांनी पकडू नये म्हणून पुणे शहराबाहेर पळून गेला होता. तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी विकी जाधव हा सातारा जिल्ह्यातील दहिवडी, फलटण, माण भागात वेश बदलून वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ऋषीकेश महादेव भोसले यांच्या वावरातून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा रेकॉर्डवरील व अट्टल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, हिंजवडी व इतर पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरीचे चार, गंभीर दुखापत सारखे गंभीर स्वरुपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, किशोर वग्गु, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.














