पोलिस आयुक्तांनी साधला क्लबच्या सदस्यांशी संवाद
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : शहराच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावलेली उपस्थिती, दिमाखदार संयोजन आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात घडलेल्यानजीकच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर साधलेला हृदयसंवाद. यामुळे ‘फ्रायडे क्लब’चे दहावे स्नेहमिलन रंगतदार ठरले.
या स्नेहमेळाव्याचे संयोजक आणि कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘आमचा लोकप्रिय वर्गमित्र’ एवढ्या वर्षांच्या प्रदीर्घ काळात कायम आमच्यासोबत आहे, असे गौरवोद्गार काढले.
पुण्यातील प्रसिद्ध सॅटर्डे क्लबच्या संस्थापक सदस्यांची, तसेच पी डी पाटील, माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड, चंद्रकांत दळवी आणि शहरातील उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, सर्वपक्षीय नेते आदींची उपस्थिती स्नेहमेळाव्याचे खास आकर्षण ठरली.
पुण्याच्या जडणघडणीत मोठे योगदान असलेल्या विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी एकत्र घेऊन वैचारिक मंथन करतात, हाच तो ‘फ्रायडे क्लब’. त्याच्या यावेळच्या स्नेहमेळाव्याचे यजमानपद कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्याकडे होते.
त्यांनी कोहिनूर समूहाला साजेसे अत्यंत नेटके नियोजन केले. प्रारंभी त्यांनी सर्वांचे स्वागत केले. नंतर कोहिनूर ग्रुपची आणि गोयल यांच्या ७० व्या वाढदिवस कार्यक्रमाची झलक असलेली चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचा गोयल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी, शहरात अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांचा उल्लेख करताना, पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने अत्यंत गंभीरपणे कारवाई करत आहे, याची उदाहरणांसह माहिती दिली.
त्याआधी राजेश पांडे यांनी ‘फ्रायडे क्लब’चा उद्देश स्पष्ट केला. उद्योजक सुधीर मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. राज देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रख्यात वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या चुरचुरीत रचना ऐकून खळखळून हसत स्नेहमेळाव्याची सांगता झाली.
