महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आदर्श आचारसंहिता भंगाच्या ३३३ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी ३०१ तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल’ ॲप विकसित केलेले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जाते.
या ॲपवर जिल्ह्यात नागरिकांकडून ३५२ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ३३३ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ५ तक्रारी, बारामती १२, भोसरी १, चिंचवड ६, दौंड ४, हडपसर ३, इंदापूर १, जुन्नर ३, कसबा पेठ २८, खडकवासला ५, मावळ ६, पर्वती ६१, पिंपरी २, पुणे कॅन्टोन्मेंट २०, शिवाजीनगर ७ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात १३७ अशा एकूण ३०१ तक्रारींवर पहिल्या शंभर मिनिटांत कार्यवाही करण्यात आली आहे.
‘सी-व्हिजिल’ ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसेसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. या ॲपवर तक्रार दाखल करणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाते.
