दुबईला गेलेल्या अध्यक्षांच्या नावाने फसवणूक; सायबर पोलिसांची १० महिन्यांनंतर यशस्वी कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या अध्यक्षांच्या नावाने टेक्स्ट मेसेज पाठवून तब्बल ४ कोटी ६ लाख १७ हजार ३१६ रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरटीला सायबर पोलिसांनी तब्बल १० महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अटक केली. सानिया ऊर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी (वय २१, रा. लोहरपत्ती, गोपालगंज, बिहार) असे तिचे नाव आहे.
२५ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडलेल्या या प्रकारात, कंपनीचे अध्यक्ष दुबईला गेले असताना त्यांच्या नावाने बनावट टेक्स्ट व व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यात आले. या मेसेजमध्ये आर्थिक व्यवहारासाठी तातडीने आरटीजीएस करण्याची विनंती करण्यात आली होती. फिर्यादी, जे कंपनीतील उप सरव्यवस्थापक (अकाऊंट्स) आहेत, यांनी अध्यक्षांचाच मेसेज समजून अनेकदा पैसे पाठवले.
४ फेब्रुवारीला अध्यक्ष पुण्यात परतल्यावर ही फसवणूक उघड झाली. कंपनीच्या नावाने पाठवण्यात आलेल्या बनावट मेसेजमुळे फिर्यादी व कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले.फसवणुकीनंतर सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरटीचा मागोवा घेतला.
तिचा मागोवा दिल्ली आणि नंतर बिहारमधील गोपालगंजपर्यंत लागला. पोलिसांनी वेशांतर करून रात्रभर शेतात मुक्काम केला आणि अखेर सानियाला घरात शिरत असताना तिला पकडले. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिला वेळीच जेरबंद केले.
फेब्रुवारी २०२४ मध्ये पोलिसांनी तिला फरीदाबाद येथून अटक केली होती. मात्र, पुण्याला रेल्वेने नेत असताना कोटा रेल्वे स्थानकावर ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेली. गेल्या १० महिन्यांपासून तिचा शोध सुरू होता.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम, हवालदार सीमा सुडीत, नीलम साबळे, संदीप पवार, सचिन शिंदे, अश्विन कुमकर आदींचा समावेश होता.सध्याच्या डिजिटल युगात अशा प्रकारच्या सायबर फसवणुकींना आळा घालण्यासाठी सतर्कता आणि प्रभावी तपासाची आवश्यकता आहे. सायबर पोलिसांचे हे यश अशा गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
