आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शायनिंगसाठी पिस्टल खरेदी करणाऱ्या युवकाला अटक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Police, Social • December 20, 2024
Spread the love

पुणे: शायनिंग करण्यासाठी स्वस्तात पिस्टल खरेदी करणाऱ्या १९ वर्षीय युवकाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आर्यन बापू बेलदरे (वय १९, रा. आई श्री व्हिला अपार्टमेंट, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटमधील एका मित्राकडून स्वस्तात पिस्टल मिळाल्याने त्याने ती खरेदी केली असल्याचे सांगितले आहे.

शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली कोबिंग ऑपरेशन राबवले जात होते. या तपासादरम्यान पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे आणि निलेश जमदाडे यांना माहिती मिळाली की, आई श्री व्हिला अपार्टमेंटच्या शेजारी गाईंच्या गोठ्यात एक युवक पिस्टलसह फिरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आर्यन बेलदरे याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे ४०,१०० रुपये किमतीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळले. ही पिस्टल त्याने विक्रीसाठी बाळगल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे आणि पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना केल्या आहेत. अशा प्रकारच्या कारवायांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण कायम असल्याचे दिसून येते.