२३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदीचे दागिने, १७ लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५१ हून अधिक घरफोड्यांचे गुन्हे असलेल्या अट्टल चोरट्याला पकडून शिवाजीनगर पोलिसांनी १३ घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.
हर्षद पवार (वय ३१, रा. गुलाबनगर, घोटावडे फाटा, ता. मुळशी) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून २३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच ४९ वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्यांचा जुडगा आणि घरफोडीची हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करत असताना ४ फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर बसस्टॉपवर एक संशयित थांबला असून त्याने ठिकठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता सॅकमध्ये सोने-चांदीचे दागिने तसेच घरफोडीचे साहित्य आढळून आले. अधिक चौकशीत त्याने ठिकठिकाणी रेकी करून १३ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले.
त्यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन व वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी ३, खडक आणि विमानतळ पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी २, तसेच चंदननगर, बावधन आणि आळंदी पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी १ अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
हर्षद पवार याच्यावर २०२३ पूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ५१ हून अधिक घरफोड्यांचे गुन्हे दाखल होते. २०२३ मध्ये जामीन मिळाल्यानंतर तो कारागृहाबाहेर सुटला. त्यानंतर घरफोडी करण्यापूर्वी तो परिसराची रेकी करून कोठे कोठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, याची पाहणी करत असे. घरफोडी करण्यासाठी जाताना तो सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही, याची काळजी घेत असे.
यासाठी ४० ते ५० किमीचा प्रवास करून तो घरफोडीच्या ठिकाणी पोहोचत असे. स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट व टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे. सीसीटीव्ही कॅमेरा दिसलाच तर तो मुद्दाम मोबाईलवर बोलत असल्याचा बहाणा करून त्या ठिकाणाहून बाजूला निघून जात असे. चोरलेले सोने-चांदीचे दागिने विकण्यासाठी त्याने सहआरोपी निळकंठ राऊत याची मदत घेतली.
घरफोडी करण्यासाठी त्याच्याकडे कटावणी, स्क्रू ड्रायव्हरसह वेगवेगळ्या प्रकारच्या कुलपांसाठी एकूण ४९ चाव्या सापडल्या. कुलूप उघडण्यासाठी तो या चाव्यांचा जुडगा बरोबर बाळगत असे. चाव्यांचा उपयोग करून तो कुलूप उघडत असे. कुलूप न उघडल्यास कटावणीने कडी-कोयंडा उचकटत असे.
शिवाजीनगर परिसरातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी यांच्या माहितीच्या आधारे शुभम गिरी याला शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.
या अट्टल गुन्हेगाराविषयी ग्रामीण पोलीस दलाकडून स्थानिक माहिती घेतली जात आहे. हर्षद पवार हा शनिवार आणि रविवार सोडून दिवसा घरफोडी करत असे. त्याच्यावर लवकरच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, सहाययक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, पोलीस अंमलदार सचिन जाधव, प्रविण दडस, सुदाम तायडे, कृष्णा सांगवे, तेजस चोपडे आणि आदेश चलवादी यांनी केली.
