लाच घेताना कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जमिनीच्या सातबारा व फेरफारच्या नकला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरूर तहसील कार्यालयातील कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
कंत्राटी कामगार सुरज शरद थोरात (वय ३४, रा. नवोदय कॉलनी, कडेगाव, अहिल्यानगर) आणि खासगी व्यक्ती महेश बाबुराव भोसले (वय ४५, रा. बाबुरावनगर, गंगा रेसिडेन्सी, शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ३३ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांची शिरूरमधील घोटी मळा येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीचे सातबारा व फेरफारच्या नकला मिळवण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात २७ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता.
१२ मार्च रोजी अभिलेख कक्षात गेले असता त्यांची भेट कंत्राटी सुपरवायझर सुरज थोरात यांच्याशी झाली. त्यांनी तक्रारदारांना सातबारा व फेरफारच्या नकला काढून देण्यासाठी २ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. याबाबत तक्रारदारांनी १८ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी २० मार्च रोजी करण्यात आली. त्यात सुरज थोरात याने नकला देण्यासाठी २ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर तहसील कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदारांकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरज थोरात याला पकडण्यात आले. त्याला लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या महेश भोसले यालाही पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे तपास करीत आहेत.




















