३० लाखांच्या जबरी चोरी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित
गुन्हा दाखल न करता प्रॉपर्टी मिसिंगची नोंद : मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनंतर दुसरी कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड परिसरात झालेल्या ३० लाख रुपयांच्या जबरी चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करता केवळ प्रॉपर्टी मिसिंगची नोंद करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी निलंबित केले आहे.
अक्षयकुमार नारायण गडगडे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. यापूर्वी याच प्रकरणात मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांनाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले होते.
पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे हे मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० लाख रुपयांची जबरी चोरी झाली होती. याप्रकरणी फिर्यादी श्रवण शंकरलालजी देवासी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, जबरी चोरीचा गंभीर प्रकार घडल्याचे स्पष्ट असतानाही गुन्हा दाखल करण्याऐवजी गडगडे यांनी प्रॉपर्टी मिसिंगची नोंद केली.
गंभीर गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. तसेच, त्यांचे वर्तन कर्तव्याप्रती निष्काळजीपणाचे, बेशिस्त आणि बेजबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असल्याने अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी गडगडे यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
असा उघडकीस आला जबरी चोरीचा प्रकार
सॅलिसबरी पार्क परिसरात मार्केटयार्ड येथील एका व्यापाऱ्याला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, व्यापाऱ्याने हातातील रोकड असलेली बॅग न सोडल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसला. या प्रकरणाचा तपास करताना स्वारगेट पोलिसांनी निहाल नवनाथ अडागळे (वय १९, रा. मुंढवा) आणि यश प्रवीण सोनवणे (वय २४, रा. मांजरी) यांना अटक केली होती.
आरोपींकडे केलेल्या तपासात सॅलिसबरी पार्कमधील लुटीचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी मार्केटयार्ड परिसरात एका व्यापाऱ्याच्या कामगाराला मारहाण करून ३० लाख रुपये लुटल्याचे उघडकीस आले. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रॉपर्टी मिसिंगची नोंद करण्यात आल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना निलंबित केले. आता याच प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
