जाणून घ्या नवीन दर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती लागू झाल्या आहेत. दर महिन्यातील एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल केला जातो. मात्र, यंदा १ जानेवारीपूर्वीच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना आज सकाळी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. म्हणजेच आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरवर सुमारे ४० रुपये कमी मोजावे लागतील. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात
१ जानेवारीपूर्वी एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. आजपासून म्हणजे २२ डिसेंबरपासून दिल्ली ते पाटणापर्यंत एलपीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला असून ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे, तर घरगुती सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ आहेत.
दिल्लीत इंडेन व्यावसायिक सिलिंडर १,७५७ रुपयांना मिळेल, जो यापूर्वी १७,९६.५० रुपयांना उपलब्ध होता. कोलकात्यात याच १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आता १,८६८.५० रुपये आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,७४९ ऐवजी आता १,७१० रुपये इतकी असणार आहे. १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सुधारित करण्यात आले होते. तर यापूर्वी १६ नोव्हेंबरला करवा चौथच्या दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी महागला होता.
घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये बदल नाही
यासोबतच १४.२ किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या अपडेटनुसार, आजही १४.२ किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर ३० ऑगस्टच्या दराने उपलब्ध आहेत.
